Wednesday, 20 January 2016

जलसंधारण - काळाची गरज


जल है तो कल है

🎞️ पाणी हरवलं कोणी ते चोरलं- भारुड Video 

🎞️ शोषखड्डा कसा बनवतात-पाणी फाउंडेशन Video

🎞️ विहीर पुनर्भरण कसे करावे?  व्हिडिओ पहा

🎞️ जलशक्ती अभियान- लोकचळवळ व्हावी

🎞️ जमिनीची धूप- राहुल पाटील यांचा video

जल हेच जीवन असून हा अमृतरूपी साठा आपल्या भावी पिढीसाठी राखून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. दरवर्षीचे दुष्काळाचे सावट पाहता शेतीसाठी पाण्याचे जतन करावेच लागेल. यासाठी पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची काळजी  शेतक-यांपासून सर्वानीच घेणे आवश्यक आहे. पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवून पाण्याचे संवर्धन करू शकतो. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. गेल्या ५० वर्षात दरडोई पाण्याची उपलब्धता एक-तृतीयांशने कमी झाली आहे. पावसाच्या प्रमाणात वर्षागणिक होत चाललेली घट यामुळे दरवर्षीच देशातील अनेक भाग दुष्काळाच्या छायेत असतात. म्हणूनच शेती आणि दररोजच्या वापरासाठी पाण्याचे नियोजन व्हायलाच पाहिजे. यावर जलसंधारण हाच एकमेव उपाय आहे.शहरी असो वा ग्रामीण प्रत्येकाने पाण्याच्या नियोजनाबाबत जागृत झाले पाहिजे. अशा नियोजनामध्ये मग योग्य सिंचन पद्धतीचा अवलंब, घरगुती पाण्याचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, विहीर पुनर्भरण व रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी पाणीबचतीचे उपाय करून पाणी समस्या कमी करता येईल. विहिरीतीलच नव्हे तर कालव्याच्या पाण्याचाही अपव्यय होताना दिसतो. मोठमोठया धरणांत साठवलेले पाणी कालव्यातून पिकांना सोडले जाते. जमिनीखालील पाणी उपसण्यासाठी यंत्रे तुटून पडलेली दिसतात. प्रत्येक शेतक-याच्या शेतात दोन-तीन कूपनलिका असतात. शहरातही घरोघरी बोअरवेल आहेतच. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, जलशोषक खड्डे , पाझर तलाव शेततळे याद्वारे भूगर्भात पाणी जिरवले तरच जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहील. रेनवॉटर हार्वेस्टिंगने साठवलेले पाणी संरक्षित पाणी म्हणून पिकासही वापरता येईल. इस्त्रायल या छोटय़ा देशाने पाण्याचे नियोजन कसे असावे याचा धडाच जगाला घालून दिला आहे. यामुळेच कसदार जमीन नसतानाही या देशाने कृषी क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. भारतातील शेतक-याने विविध मशागतीच्या पद्धती, पीकपद्धती वापरून मृदा आणि जलसंधारण केले पाहिजे. सामान्य नागरिकांनीसुद्धा सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करावा.जलसंधारण ही काळाची गरज झाली आहे. बेभरवशाचा होत चाललेला मान्सून, पावसाचं कमी झालेलं प्रमाण पाहता पाण्याची बचत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलसंवर्धन, पाण्याचा पुनर्वापर हाच आता सगळ्यांचा मुख्य अजेंडा असायला हवा. परंतू जनसहभागाशिवाय ही चळवळ यशस्वी होऊ शकणार नाही, हेही तितकंच खरं.

✒✒ ओमप्रकाश मं. यादव ( कृषी विद्यावेत्ता)

1 comment: